
बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक ६ची धडक कारवाई; दुकानदारांच्या फ्रंट मार्जिंग व पत्रा शेडवर हातोडा
सर्जेराव देशमुख : पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक ६ कडून कर्वेनगर आणि एरंडवणा परिसरात अनधिकृत बांधकामे तसेच फ्रंट मार्जिंगमध्ये करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या या कारवाईमुळे संबंधित व्यावसायिकांचे धाबे दणाणले असतानाच, एरंडवणा परिसरातील कारवाईवरून मात्र वेगळीच चर्चा रंगली आहे.
कर्वेनगर आणि एरंडवणा भागात रस्त्यालगतच्या फ्रंट मार्जिंगमध्ये उभारण्यात आलेले पत्रा शेड, अनधिकृत बांधकामे तसेच व्यावसायिक वापरासाठी करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर महापालिका पथकाने कारवाई केली. महापालिकेच्या जागेचा अथवा बांधकाम नियमांचा भंग करून करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मात्र, एरंडवणा परिसरातील कारवाईचीच अधिक चर्चा सुरू आहे. या भागात अनेक दुकानदारांच्या फ्रंट मार्जिंगमधील पत्रा शेड व इतर अनधिकृत रचनांवर कारवाई करण्यात आली. मात्र, एका बड्या राजकीय पक्षाच्या नेत्याचे कार्यालय असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या ठिकाणीही फ्रंट मार्जिंगचा वापर किंवा अनधिकृत रचना असल्यास तेथे कारवाई का झाली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
‘सामान्य दुकानदारांसाठी एक नियम आणि राजकीय नेत्यांसाठी दुसरा नियम?’ अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे. संबंधित कार्यालयाला आवश्यक त्या सर्व परवानग्या आहेत का, फ्रंट मार्जिंगचा वापर नियमांनुसार आहे का, तसेच तेथे कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम असल्यास त्यावर कारवाई का करण्यात आली नाही, याबाबत महापालिका प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी होत आहे.
महापालिका प्रशासनाने कर्वेनगर आणि एरंडवणा परिसरातील सर्व बांधकामे व फ्रंट मार्जिंगची समान निकषांवर तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कारवाई करताना कोणताही राजकीय दबाव किंवा भेदभाव होऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, झोन क्रमांक ६च्या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामधारकांमध्ये खळबळ उडाली असली, तरी एरंडवण्यात ‘त्या’ राजकीय कार्यालयावर कारवाई होणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
