सर्जेराव देशमुख : खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, वाहनचोरी, मोबाईल चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमधील आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने जेरबंद केले. पिंपळगाव रुपवारेसिंग दुधाणी, वय ४२, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड, पुणे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुणे शहरातील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक १ मधील अधिकारी व कर्मचारी गंभीर गुन्ह्यांतील पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीबाबत माहिती मिळाली. आरोपी सोलापूर येथे असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार महेश पाटील यांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पथकाने सोलापूर येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या मदतीने राहते घराजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने संबंधित गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.आरोपीविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्याच्यावर भारतीय दंड संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातील तरतुदींनुसारही कारवाई करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला कोथरूड विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खुटके यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक फडतरे तसेच पोलीस अंमलदार बाळू गायकवाड, महेश पाटील, साई कारके, अमित गद्रे, प्रदीप राठोड, रविंद्र लोखंडे, अजित शिंदे, साधना पवार, विद्या पन्हाड व नारायण बनकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.
