कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे यापेक्षाही जास्त शरद पवारांचा नातू विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असा सामना पाहायला मिळणार आहे त्यामुळे कर्जत जामखेड मध्ये नेमकं कोण येणार कर्जत जामखेडची जनता कोणाला निवडणार? कोणते मुद्दे निवडणुकीवर प्रभाव टाकणार? हे जाणून घेऊयात
तब्बल 25 वर्ष भाजपाच्या ताब्यात असलेला गड शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी 2019 मध्ये भेदला आणि तब्बल 43 हजारांच्या लीडने राम शिंदेंना पराभूत करत रोहित पवार विधानसभेवर निवडून आले. आणि आता पुन्हा कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे हा सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीवर नेमके कोणते मुद्दे प्रभाव टाकू शकतात नेमकं कोणत्या मुद्द्यान भोवती कर्जत जामखेडच राजकारण फिरतंय तेच पाहूयात.
कर्जत जामखेडच्या निवडणुकीवर प्रभाव टाकणारा सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे भूमिपुत्राचा!
रोहित पवार हे कर्जत जामखेड मध्ये आयात उमेदवार आहेत ते मूळचे इथले नाहीत. या विरुद्ध त्यांच्या समोर उभे असलेले राम शिंदे मात्र कर्जत जामखेडचेच असल्याने भाजपाकडून “भूमिपुत्र हवा बाहेरचा नको” या मुद्द्यावर निवडणूक लढवली जात आहे. याच पद्धतीने मागच्या वेळेस देखील राम शिंदें कडून प्रचार करण्यात आला होता मात्र त्याचा तेव्हा त्यांना फारसा फायदा झाला नाही त्यामुळे आता पुन्हा देखील तीच प्रचार प्रणाली अवलंबत प्रचार करणाऱ्या भाजपच्या राम शिंदेंना या भूमिपुत्र पॅटर्नचा किती फायदा होईल हे सांगता येत नाही.Read More
दुसरा मुद्दा आहे स्थानिक गणितांचा. शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांच्यासह उबाठा गटाचे जामखेड तालुकाध्यक्ष संजय काशीद, जामखेड शहराध्यक्ष सुरज काळे यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.
यातील मधुकर राळेभात हे येथील स्थानिक मराठा नेते असून मतदारसंघातील मराठा तरुणांमध्ये त्यांचं नाव व त्यांनी घेतलेली प्रत्येक भूमिका नेहमीच चर्चेत असते. ज्याचा फायदा राम शिंदेंना होऊ शकतो.
तर दुसरीकडे राजेंद्र देशमुख यांनी देखील भाजपा सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे. राजेंद्र देशमुख हे बापूसाहेब देशमुख यांचे नातू. तब्बल 18 वर्षे पंचायत समितीचे बापूसाहेब देशमुख हे सभापती होते तसेच जगदंबा साखर कारखान्याचे 21 वर्ष चेअरमन. त्यानंतर 2009 मध्ये हा मतदारसंघ खुला झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने विधानसभेची उमेदवारी बापूसाहेब देशमुख यांनी दिली होती आणि अवघ्या दहा हजारांच्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे त्यांचेच नातू असलेल्या राजेंद्र देशमुख यांचा मोठा जनसंपर्क या मतदार संघात असून याचा मोठा फायदा रोहित पवार यांना होऊ शकतो.
कर्जत जामखेडच्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणारा पुढचा मुद्दा आहे येथील जातीय समीकरणांचा. कर्जत खालापूर मध्ये १ लाख 28 हजार ओबीसी मतदार, एक लाख वीस हजार मराठा मतदार, तीस हजार मुस्लिम मतदार व 42000 एस सी मतदार आहेत त्यामुळे एकूणच ओबीसी प्रवर्गातल्या मतदारांची संख्या येथे जास्त असून याचा फायदा रोहित पवारांना होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच हा मतदारसंघ मराठवाड्याच्या सीमावरती भागांमध्ये येत असल्याने मराठा फॅक्टर देखील येथे प्रभाव पाडू शकतो असं बोललं जातंय.
या निवडणुकीमध्ये रोहित पवार व राम शिंदे या दोघांच्या नावासारखे इतर उमेदवार निवडणुकीत उभे असल्याने रोहित पवार व राम शिंदे या दोघांनाही याचा फटका बसू शकतो खास करून रोहित पवार यांना कारण रोहित पवार या नावाच्या दुसऱ्या उमेदवाराला पिपाणीचे चिन्ह मिळाल्याने लोकसभेला शरद पवार गटाची डोकेदुखी बनलेली पिपाणी कर्जत जामखेडमध्ये देखील रोहित पवारांना त्रासदायक ठरू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांसोबतच मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात झालेले फोडाफोडीचे राजकारण, कर्जत मधील एमआयडीसीचा मुद्दा, शरद पवार यांच्या बद्दल लोकांमध्ये असलेली सहानुभूती या सर्व मुद्द्यांचा थेट परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोहित पवार त्यांचा गड अभेद्य ठेवणार का भाजपा पुन्हा एकदा कर्जत जामखेड मध्ये कमळ फुलवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ज्यात कर्जत जामखेड मध्ये काटे की टक्कर होणार हे निश्चित असून रोहित पवारांचं पारडं जड असल्याच पाहायला मिळत. तर यावर तुमचं मत काय ते कंमेंट करून नक्की सांगा…..