
सर्जेराव देशमुख : पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग (झोन क्र. ६) तर्फे कर्वेनगर येथील शाहू कॉलनी परिसरात सुमारे २३,१३० चौ.फुट अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मंगळवारी करण्यात आली.
कर्वेनगर येथील शाहू कॉलनी गल्ली क्रमांक १, कमिन्स कॉलेज रोड, दुधाणे लॉन्स डीपी रोड या परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत फ्रंट व साईड मार्जिनमधील अनधिकृत पत्रा शेड, तसेच ३६ मीटर डीपी रोडवरील ग्रीन बेल्टमध्ये उभारण्यात आलेले अनधिकृत कच्चे-पक्के स्वरूपाचे पत्राशेड बांधकाम व त्यास अनुषंगिक इतर कामांवर कारवाई करण्यात आली. यासंदर्भात एकूण ४५ नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
सदर कारवाई बांधकाम विकास विभाग (झोन क्र. ६) अंतर्गत शहर अभियंता, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.कारवाईदरम्यान उप अभियंता दीपक सोनवणे, कनिष्ठ शाखा अभियंता अमोल सोळंकी, योगेश भोसले व भाग्यश्री देवकर, तसेच सहाय्यक रामकिशन राठोड, बाळासाहेब बडदे आणि ट्युलिप इंजिनियर यांच्या नियंत्रणाखाली कारवाई पार पडली.पुणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई सुरू ठेवत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अशी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.
