सर्जेराव देशमुख : पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट-१ने आंबेगाव परिसरात कारवाई करून गावठी बनावटीच्या लोखंडी पिस्तुलासह एका १८ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. प्रणव विजय सणस (वय १८ वर्षे २२ दिवस, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल मिळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस अधिकारी व अंमलदार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अविनाश दळवी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तनगर परिसरात, स्वाद हॉटेलजवळील स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटरच्या बाजूला सार्वजनिक रस्त्यावर प्रणव सणस हा गावठी पिस्तूल घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली. या शस्त्राचा वापर एखाद्या गंभीर गुन्ह्यात होण्याची शक्यता असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या निर्देशानुसार पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक खासगी वाहनाने संबंधित ठिकाणी रवाना झाले. पथकाला दिलेल्या वर्णनाशी मिळताजुळता तरुण घटनास्थळी आढळून आला. त्याची चौकशी करून ओळख पटविण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या अंगझडतीत त्याच्या उजव्या बाजूच्या खिशात अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आढळून आले.पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मिळालेल्या शस्त्रासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी आंबेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या कारवाईत पोलीस हवालदार संतोष नागरे, समीर शेख, अतुल साळवे, सचिन अहिवळे, सचिन कोळी आणि पोलीस अंमलदार अविनाश दळवी सहभागी झाले.
