नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडविल्याने भविष्यात पूरस्थितीचा धोका; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

सर्जेराव देशमुख : बावधन परिसरात नैसर्गिक नाला बुजवून त्यावर रस्ता तयार करण्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यात परिसरातील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा नाला बुजविल्यामुळे नैसर्गिक जलप्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात मुसळधार पावसाच्या वेळी परिसरात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.
बावधन येथील सर्व्हे नंबर २६,२७,३३ येथून नैसर्गिक नाला वाहत असून येथील नाल्याच्या प्रवाहामध्ये व लगतच राडारोडा टाकून रस्ता तयार करण्यात आला असल्याचे पाहणी दरम्यान लक्षात येते. अनेक वर्षापासून वाहत असलेल्या नैसर्गिक नाला एका ठिकाणी भराव टाकून त्याचा प्रवाह बंद केला आहे तर उर्वरित प्रवाहाचा मार्ग अरुंद केला आहे अशी माहिती नागरिकांनी दिली. हा नाला डोंगर माथ्यावरून वाहत असून बावधनमधील प्रसिद्ध महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूलाच नाल्याच्या प्रवाहामध्ये भराव टाकत रस्ता केला असल्याने महाविद्यालयाला धोका निर्माण होऊ शकतो असे मत पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केले.

सदरचा नैसर्गिक नाला गाव नकाशा व पालिकेच्या विकास आराखड्यामध्ये देखील दिसत आहे. नाल्याचे अस्तित्व कायम ठेवणे आणि त्याचा नैसर्गिक प्रवाह अबाधित ठेवणे आवश्यक असताना, बांधकाम व्यावसायिक व जागा मालकाकडून नाल्यावर भराव टाकून रस्ता तयार करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच या प्रकारासाठी संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली होती का, नाला बुजविण्यास कोणाची मंजुरी होती आणि रस्ता तयार करण्यासाठी कोणत्या नियमांचे पालन करण्यात आले, याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
याबाबत बांधकाम विकास विभागाचे अधिकारी अजय फाले यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, नाला बुजविला असल्याची व रस्ता तयार केला असल्याची माहिती नाही, त्याबाबत जागेची पाहणी करून सायंकाळपर्यंत माहिती कळविण्यात येईल. सायंकाळी त्यांना पुन्हा संपर्क साधला असता त्यांच्या संपर्क होऊ शकला नाही.

नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण व भराव टाकण्याच्या प्रकारांकडे वेळीच लक्ष न दिल्यास पावसाळ्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासन आता काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सहकारनगर, दांडेकर पूल, कात्रज – धनकवडी परिसर, सिंहगड रोड, मार्केट यार्ड परिसर तसेच शहरांतील अनेक ठिकाणी नाले अरुंद झाल्याने, काही ठिकाणी बुजविल्यामुळे पाण्याचा मोठा फटका बसल्याची घटना डोळ्यासमोर आहे. सध्या बावधनमधील नाल्यामध्ये चालू असलेला प्रकार भविष्यात मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
