५०० यार्डांतील ‘नो-कन्स्ट्रक्शन’ झोनमध्ये नियम धाब्यावर; मोजक्यांवर नोटिसांचा देखावा, वजनदारांकडे प्रशासनाचा कानाडोळा.

सर्जेराव देशमुख : पुण्यातील सुतारवाडी व पाषाण सीमेवर असलेल्या केंद्र सरकारच्या ‘उच्च विस्फोटक पदार्थ संशोधन प्रयोगशाळा’ (HEMRL) या अत्यंत संवेदनशील संरक्षण संस्थेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भारत सरकारच्या २७ एप्रिल २००२ च्या अधिकृत राजपत्रानुसार (Gazette Notification) आणि ‘वर्क ऑफ डिफेन्स अॅक्ट’अंतर्गत, HEMRL च्या सुरक्षा भिंतीपासून ५०० यार्ड (सुमारे ४५७ मीटर) परिसरामध्ये कोणतेही कायमस्वरूपी किंवा तात्पुरते बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. हा संपूर्ण परिसर ‘नो-कन्स्ट्रक्शन / प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून बावधन परिसरामध्ये या सुरक्षा नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात जमिनी सपाटीकरण करून त्यावर लोखंडी खांब आणि पत्र्यांचे अजस्र शेड्स उभारले जात आहेत. गोदामे, गॅरेज, खेळाचे टर्फ तसेच विविध व्यावसायिक वापरासाठी हे शेड्स भाड्याने दिले जात आहेत. संरक्षण विभागाच्या दृष्टीने हा परिसर अतिसंवेदनशील असताना, येथे दिवस-रात्र अवजड वाहनांची ये-जा आणि अनोळखी व्यक्तींचा वावर वाढला आहे. यामुळे देशाच्या महत्त्वाच्या संशोधन संस्थेच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण होत असल्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून काही निवडक शेडधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.केवळ कागदोपत्री नोटिसा दाखवून प्रत्यक्षात पाडापाडी टाळली जात असल्याचे आरोप केले जात आहेत. प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
“HEMRL सारख्या संवेदनशील संस्थेभोवती ५०० यार्डांत साधी वीट रचण्यासही बंदी असताना, एक-दोन गुंठ्यांपासून एकरभर क्षेत्रात महाकाय शेड्स कसे उभे राहतात? नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच आहेत का?” असा सवाल स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी विचारत आहेत.या संदर्भात संरक्षण विभाग आणि महापालिका प्रशासन समन्वयाने ठोस मोहीम राबवून सर्व अनधिकृत शेड्स जमीनदोस्त करणार की ‘नोटिसांचा खेळ’ असाच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एक ते दोनच शेड पूर्वीपासून अस्तित्वात होती. परंतू मागील काही वर्षापासून अनेक शेड उभे राहिले असून यामध्ये वाढ होत आहे. ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट असताना शेडची संख्या बोटावर मोजण्याइतकीच होती, महापालिकेत भाग समाविष्ट झाल्यापासून सदर ठिकाणी वाढ झाल्याचे रहिवाश्यांनी सांगितले. नोटीसा बजावल्या आहेत यातील काही जणांनी पालिकेत धाव घेत त्यावर स्थगिती मिळवली आहे, तर उर्वरित शेड मात्र मोठ्या दिमाखात उभी आहेत. नोटीसा बजावल्यानंतर देखील शेडचे काम सुरू असल्याचे देखील नागरिकांनी सांगितले.
याबाबत बांधकाम विभाग झोन ३ चे उपअभियंता भास्कर हांडे यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
