कोथरूडमधील CTS क्रमांक ३२५, ३२७, ३२८ आणि ३२९ प्रकरण; पुणे महापालिकेकडे तक्रार दाखल.
सर्जेराव देशमुख : कोथरूड परिसरातील CTS क्रमांक ३२५, ३२७, ३२८ आणि ३२९ या मिळकतींच्या बांधकाम परवानगी प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिकाला आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने चुकीच्या पद्धतीने बांधकाम परवानगी देण्यात आल्याचा संशय व्यक्त करत लियाकत सिकंदर शेख यांनी पुणे महानगरपालिकेला याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे.
शेख म्हणाले की, सदर माझी जागा विकसनासाठी बांधकाम व्यावसायिकाला दिली होती. इमारतीबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविलेली कागदपत्रे आणि प्रत्यक्ष जागेवरील परिस्थिती यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. दुरुस्त नकाशा मंजुरीच्या वेळी दाखल केलेला प्रस्ताव, स्क्रुटिनी रिपोर्ट, मूळ चलन आणि मूळ बांधकाम परवानगी प्रमाणपत्र (CC) ही कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे परवानगी प्रक्रियेबाबत संशय निर्माण होत असल्याचे शेख यांचे म्हणणे आहे.
अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र (Fire NOC) संबंधित कागदपत्रांमध्ये आढळून येत नाही तसेच तसेच संपूर्ण इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र नसतानाही इमारतीचा वापर सुरू करण्यात आला आहे. यामुळे याची वरिष्ठ पातळीवर चौकशी झाली पाहिजे व कायदेशीर कार्यवाही व्हावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
बांधकाम विभागाचे उपअभियंता सचिन बागडे यांना याबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या प्रकरणातील महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका समजू शकली नाही.
आता या प्रकरणात पुणे महानगरपालिकेचा बांधकाम विभाग काय भूमिका घेते आणि संबंधित बांधकाम परवानगीची चौकशी करणार का, याकडे कोथरूडमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
