‘राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) वतीने लक्षवेधी मोहीम; निष्पक्ष चौकशीची मागणी

सर्जेराव देशमुख : स्वर्गीय अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूला नऊ महिने उलटून गेले तरी या प्रकरणाचे गूढ अद्याप कायम असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (शरदचंद्र पवार) केला आहे. या मृत्यूमागील नेमके सत्य काय आणि जनतेला या प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार, असा थेट सवाल उपस्थित करणारे फलक कोथरूड विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. या फलकबाजीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले असून राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी लावलेल्या फलकाद्वारे ही भूमिका मांडली आहे. कोथरूडमधील प्रमुख चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या या फलकांवर स्व. अजित पवार यांच्या छायाचित्रासह “अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळणार? अजितदादांना न्याय मिळालाच पाहिजे!” असा आशय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या मोहिमेबाबत माहिती देताना गिरीश गुरनानी यांनी सांगितले की, “अजितदादांच्या निधनाला नऊ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, या घटनेप्रकरणी अद्याप ना एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे, ना तपासाबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आली आहे. चौकशीचा अहवाल आणि या अपघातामागील नेमके सत्य अद्यापही जनतेपासून दूर आहे.
“या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत महत्त्वाचे असून, या प्रश्नांची उत्तरे मिळणे हा केवळ राजकीय विषय नसून सत्य आणि न्यायाचा प्रश्न असल्याचे गुरनानी यांनी स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर येईपर्यंत हा लढा आणि प्रश्नांची मालिका सुरूच राहील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार) वतीने देण्यात आला आहे.

