समस्या-आधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांवर उपाय शोधावेत; एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या संशोधन परिषदेचे उद्घाटन

सर्जेराव देशमुख : शिक्षणाचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख बनविणे नसून, समाजातील प्रत्यक्ष समस्या समजून घेऊन त्यावर व्यावहारिक उपाय शोधण्याची क्षमता विकसित करणे हाही आहे. त्यामुळे शिक्षण हे केवळ उद्योगांशीच नव्हे, तर समाजाच्या प्रश्नांशीही जोडले गेले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या वतीने आयसर पुणे येथे आयोजित ‘उच्च शिक्षणातील समस्या-आधारित शिक्षण’ या विषयावरील चौथ्या आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संशोधन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील समन्वय वाढविण्याच्या उद्देशाने तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
पाटील म्हणाले, राज्यात दुष्काळ आणि पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर आहे. या समस्यांवर व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी शिक्षण संस्था, स्थानिक प्रशासन आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. समस्या-आधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समाजात जाऊन समस्या समजून घेता येतात. त्यावर सामूहिकरीत्या उपाय शोधण्याची संधी मिळते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांना विशेष महत्त्व आहे.समस्या-आधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, सर्जनशीलता, संवादकौशल्य आणि सांघिक वृत्ती विकसित होते. ही कौशल्ये रोजगार मिळविण्याबरोबरच जबाबदार नागरिक घडविण्यासाठीही उपयुक्त ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे होत्या. आयआयटी रोपरचे संचालक प्रा. राजीव आहुजा प्रमुख उपस्थित होते. डेन्मार्कमधील अलबोर्ग विद्यापीठाच्या युनेस्को पीबीएल सेंटरच्या संचालिका प्रा. क्झियानग्यून डू, विद्यापीठाचे संस्थापक-कुलगुरू डॉ. गोपाळकृष्ण जोशी आणि आयसरचे संचालक प्रा. सुनील भागवत उपस्थित होते.प्रा. स्वाती कराड चाटे यांनी समस्या-आधारित शिक्षणाचा शालेय स्तरावरही व्यापक अवलंब करण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत ज्ञानासोबत संवादकौशल्य विकसित होणे आवश्यक आहे. समाजातील समस्या ओळखून त्यावर चर्चा व सामूहिक उपाययोजना केल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, असे त्यांनी सांगितले.
प्रा. राजीव आहुजा यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात शिक्षकांनी अध्यापनाच्या पद्धतीत नावीन्य आणण्याची गरज व्यक्त केली. इंटरनेटवर सहज उपलब्ध नसलेले ज्ञान, अनुभव आणि मार्गदर्शन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशिक्षित व गुणवत्तापूर्ण शिक्षक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रा. क्झियानग्यून डू यांनी समस्या-आधारित शिक्षण ही विविध ज्ञानशाखांना जोडणारी आणि समाजात अर्थपूर्ण बदल घडविणारी कार्यपद्धती असल्याचे सांगितले. डॉ. गोपाळकृष्ण जोशी यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कृष्णकेदार गुमास्ते यांनी स्वागत केले. प्रा. रूपाली धामणे यांनी सूत्रसंचालन केले, तर परीक्षा नियंत्रक डॉ. प्रभा कासलीवाल यांनी आभार मानले.
पदवी अभ्यासक्रमात इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपचा समावेश कराराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करताना पदवी अभ्यासक्रमात इंटर्नशिप, प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण आणि अप्रेंटिसशिपचा समावेश करणे आवश्यक आहे. तसेच समस्या-आधारित शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
