सर्जेराव देशमुख : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने शहरातील नामांकित हॉटेल्स आणि चौपाट्यांवर धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. फ्रंट मार्जिन, साइड मार्जिन आणि रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांविरोधात सलग सहाव्या दिवशी सुरू असलेल्या या मोहिमेत लाखो स्क्वेअर फूट जागा मोकळी करण्यात आली. मात्र, एरंडवणा परिसरात प्रशासनाकडून निवडक ठिकाणीच कारवाई होत असल्याचा आरोप होत असून, या ‘दुजाभावाच्या’ धोरणामुळे परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ते व पदपथ मोकळे करण्यासाठी महापालिकेने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईत अनेक बड्या हॉटेल व्यावसायिकांचे अनधिकृत शेड आणि फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.मात्र, एरंडवणा भागातील चित्र काहीसे वेगळे दिसून येत आहे. या परिसरातील काही मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणविरोधी पथकाचा बुलडोझर फिरला असताना, दुसरीकडे भरतकुंज परिसर आणि श्री किशोर भगीरथ तापडिया पथ या भागांत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या भागातील अतिक्रमणांकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे का, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
एकाच प्रभागात आणि एकाच परिसरात कारवाईचे दोन वेगवेगळे निकष का लावले जात आहेत, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता असावी आणि कोणताही राजकीय किंवा इतर दबाव न घेता भरतकुंज व तापडिया पथ परिसरातील अतिक्रमणांवरही तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून जोर धरू लागली आहे. आता महापालिका प्रशासन या चर्चेनंतर संबंधित भागांत कारवाईचा बडगा उगारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या संदर्भात बोलताना सामाजिक कार्यकर्ते राम बोरकर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “काही दुकाने इमारतीचा संपूर्ण तळमजला आणि सामासिक अंतरातील (मार्जिन) जागा वापरत असल्याचे पाहायला मिळते. तसेच, सामासिक अंतरामध्ये मोठ्या प्रमाणात फलक उभारलेले आहेत, मात्र त्याकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक कानाडोळा होत आहे. कारवाई करताना समान कारवाई होणे अपेक्षित आहे तसेच याशिवाय, पदपथावरच महापालिकेच्या कोठ्या उभारल्या आहेत, त्यावर प्रशासन नेमकी काय कारवाई करणार?”
याबाबत बांधकाम विकास विभाग झोन ६ चे कार्यकारी अभियंता सुरेंद्र करपे यांना संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
