सर्जेराव देशमुख: दारुची नशा काही वेगळीच असते. अती मद्यपान केल्यानंतर एखादा व्यक्ती काय करेल, हे काहीच सांगता येत नाही. मग दारुची नशा उतरल्यावर आपण काय, काय केले होते? त्याची माहिती त्याला नसते. एका मद्यधुंद कर्मचाऱ्याचा वेगळाच प्रकार समोर आला आहे. क्षेत्रीय कार्यालयात घडलेला हा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. विशेष म्हणजे हा कर्मचारी पुणे महानगरपालिकेमध्ये कायम सेवेत रुजू असून सुरक्षा विभागाचा आहे. आता व्हायरल झालेले हे प्रकरण संबंधित विभागापर्यंत पोहचल्यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
काय झाला प्रकार
आज रविवारी पुणे येथील एरंडवणे भागातील वारजे – कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात धक्कादायक प्रकार घडला आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात कमरेचा पट्टा सोडून फिरत होता. येथे इतर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत कर्मचाऱ्याने धिंगाणा घातला. हा कर्मचारी सुरक्षारक्षक असून तो पालिकेत कायम सेवेत आहे. अनुराग आदमाने असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे असे समजते. त्याने शिवीगाळ करत धिंगाणा घालून सुरक्षा रक्षक असलेल्या केबिनमध्ये झोपला होता. विशेष बाब म्हणजे त्याच्या कामाची वेळ नसताना पालिकेचे कपडे परिधान करून मद्यधुंद अवस्थेत क्षेत्रीय कार्यालयात फिरत होता.
सुरक्षेबाबत
क्षेत्रीय कार्यालयात सुरक्षेसाठी चित्रीकरण व आवाज संकलन करणारे सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहे. तसेच सुरक्षारक्षक देखील येथे तैनात असतात. मद्यधुंद कर्मचारी यांनी केलेला धिंगाणा व केबिनमध्ये झोपणे हे नक्कीच संकलित झाले असावे. संकलित झालेला व्हिडिओ याची तपासणी करून कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार? तसेच मद्यधुंद कर्मचाऱ्याची वैद्यकीय करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
# याबाबत वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ आघाव यांना विचारले असता ते म्हणाले की, सदर घटनेबाबत सुरक्षा विभाग प्रमुखांना माहिती दिली असून कायदेशीर कारवाईबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.