सर्जेराव देशमुख :- पुणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून पक्षातील व अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असताना अपक्ष उमेदवारीचा अर्ज कायम ठेवत, निवडणूक चिन्ह न देता निवडणूक लढवण्याची परवानगी अपक्ष उमेदवार सचिन धनकुडे यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.
उमेदवार सचिन धनकुडे म्हणाले की, १९५१- ५२ मध्ये भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी सुमारे ८५ टक्के भारतीय नागरिक अशिक्षित होते. त्या काळातील सामाजिक वास्तव लक्षात घेऊन तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त मा. सुकुमार सेन यांनी उमेदवारांच्या नावासमोर निवडणूक चिन्ह देण्याची पद्धत स्वीकारली. त्या काळात हा निर्णय व्यवहार्य होता हे मान्य आहे.
“अशिक्षित नागरिकांसाठी उमेदवाराच्या नावापुढे चिन्ह ठेवणे हा तात्पुरता उपाय होता. परंतु लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी त्या नागरिकांना शिकवणे, साक्षर करणे व मतदान प्रक्रियेचे शिक्षण देणे ही अधिक मूलभूत गरज होती. चिन्हांच्या माध्यमातून मतदान करून घेण्यात आले, पण मतदार शिक्षणाची संधी त्या काळात पुरेशी वापरली गेलेली नाही”. असे मत त्यांनी व्यक्त केले.
आज सुमारे ८५ टक्क्यांहून अधिक भारतीय नागरिक साक्षर आहेत. EVM प्रणाली, उमेदवाराचा फोटो, नाव व माहिती यामुळ े मतदार आज अधिक सक्षम झाला आहे. आजही जे अंदाजे १५ टक्के नागरिक अशिक्षित आहेत, ते आंधळे नाहीत. EVM वरील उमेदवाराचा फोटो पाहून मतदान करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यामुळे अशिक्षित मतदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निवडणूक चिन्हे अनिवार्य राहिलेली नाहीत त्यामुळे मला चिन्ह न देता निवडणूक लढण्याची परवानगी मागितली असे धनकुडे म्हणाले.
