सर्जेराव देशमुख : बांधकाम व्यावसायिक वेगवेगळ्या योजना, अत्याधुनिक सुविधा देत बांधकाम प्रकल्प उभारत असतात. यामधून काही लाखोंचा नफा मिळवत असतात. चुकीचे कागदपत्रे असून देखील बांधकाम व्यावसायिकाला अधिक फायदा व्हावा यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा करत असल्याचा आरोप माजी शिक्षण मंडळ सदस्य राम बोरकर यांनी केला आहे.
बोरकर म्हणाले की, पुण्यातील कोथरूड परिसरात भूमी अभिलेख विभागाने केलेली मोजणी व पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक ६ ने दिलेले झोनिंग डीमार्केशन यावरून असे दिसून येते की बांधकाम प्रकल्प समोर मुख्य रस्ता नसून कॅनॉल आहे आणि सदर ठिकाणी एकच ६ मी. रुंदीचा पोहोच रस्ता उपलब्ध आहे. त्याच बांधकाम विकास विभाग झोन ने बांधकाम परवानगीचे नकाशे मंजूर करतेवेळी तेथे कॅनॉल ऐवजी १२ मीटर रुंदीचा रस्ता दर्शविला आहे. यामुळे विकसकाला अंदाजे ६५०० चौ.फू अतिरिक्त चटई क्षेत्राचा फायदा झाला असल्याचे दिसते.
इतक्यावर न थांबता कॅनलला रस्ता दर्शवून येथील मिळकतीची जागा रस्ता रुंदीकरणात दर्शवून त्याचा सुद्धा अतिरिक्त ७०० चौरस फूट क्षेत्राचा फायदा विकसकास मिळवून दिला आहे. मुळातच कॅनॉल किंवा कॅनॉल रस्ता पुणे महानगरपालिकेच्या मालकीचा नाही त्यामुळे ही परवानगी चुकीची आहे.सदर प्रकार पालिकेला निदर्शनास आणून दिला असून अद्याप कोणतीच कार्यवाही पालिकेने केलेली नाही व आम्हाला देखील कुठलीच माहिती पुरवली नाही. नक्कीच मोठया अधिकाऱ्यांना लक्ष्मी दर्शन मिळाले असावे आणि चुकीची मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्याला बचाव करत असल्याची शंका मनात येत आहे असे मत राम बोरकर यांनी व्यक्त केले.
याबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश भूतकर यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही. तसेच उप अभियंता किरण कलशेट्टी यांना विचारणा केली असता त्यांनी अपुरी माहिती देत, पूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ केली.
विनापरवानगी बांधकाम केल्यास बांधकाम विभागाकडून बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात येत असते. कागदपत्र यामध्ये असलेली तफावत यामुळे अधिकचे चौ.फू अतिरिक्त चटई क्षेत्राचा फायदा नेमका कोणासाठी असा सवाल उपस्थित होतो. यापुढे बांधकाम विभाग कोणती कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
