मंत्री चंद्रकांत पाटील यांची कोथरुडकरांसोबत अनोखी दिवाळी; वस्तीतील कुटुंबांना भेटी, खेळणी-खाऊचे वाटप

सर्जेराव देशमुख : दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई, फराळाचा सुगंध आणि आनंदाने उजळलेले चेहरे. मात्र, या आनंदाची खरी अनुभूती तेव्हाच मिळते, जेव्हा तो वंचितांच्या आयुष्यात उजेड निर्माण करतो. हाच सामाजिक सेवेचा विचार जपत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यंदाची दिवाळी कोथरुडमधील विविध वस्ती भागांतील कुटुंबांसोबत अत्यंत आत्मीयतेने साजरी केली. त्यांच्या या भेटीमुळे वस्तीतील शेकडो कुटुंबांच्या घरात दिवाळीचा खरा आनंद पोहोचला, तर खेळणी आणि खाऊ मिळाल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य या उपक्रमाचे खरे समाधान ठरले.
दिवाळीच्या सणानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघातील विविध वस्ती भागांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. यावेळी त्यांनी नागरिकांशी आस्थेने संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांना दिवाळी फराळ तसेच लहान मुलांना खाऊ आणि आकर्षक खेळण्यांचे वाटप करण्यात आले. हातात नवी खेळणी पडताच मुलांच्या डोळ्यांत चमकलेला निरागस आनंद उपस्थितांची मने जिंकून घेणारा होता. केवळ भेटवस्तूंच्या वाटपापुरते मर्यादित न राहता, परिस्थितीच्या मर्यादांमध्ये सण साजरा करणाऱ्या कुटुंबांसाठी ही भेट मोठा दिलासा देणारी ठरली.
या संपूर्ण उपक्रमात सर्वांत भावूक आणि मनाला स्पर्शून जाणारा क्षण तेव्हा घडला, जेव्हा वस्तीतील काही लहान मुलांनी दुष्काळग्रस्त भागातील गरजू बांधवांच्या मदतीसाठी स्वतःचे पिगी बँक (गल्ला) थेट चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. स्वतःच्या छोट्या-छोट्या आवडीनिवडी व खेळण्यांसाठी वर्षभर साठवलेला हा खाऊचा पैसा सामाजिक कार्यासाठी देण्याच्या या मुलांच्या कृतीने उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.
चिमुकल्यांच्या या संवेदनशीलतेचे भरभरून कौतुक करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “या लहानग्या हातांनी दिलेली मदत रकमेने कदाचित लहान वाटू शकेल, मात्र त्यामागील सामाजिक जाणीव आणि भावना हिमालयाएवढी मोठी आहे. स्वतःच्या आनंदापेक्षा दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घालण्याचे हे संस्कार कौतुकास्पद आहेत. या बालमित्रांनी दिलेला प्रत्येक रुपया गरजूंपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवला जाईल.
“समाजातील शेवटच्या घटकालाही सणाचा आनंद घेता यावा आणि त्यांना आपलेपणाची ऊब मिळावी, या उद्देशाने पार पडलेल्या या संवेदनशील उपक्रमाचे कोथरुड परिसरातील नागरिकांकडून मोठे स्वागत होत आहे.

