सर्जेराव देशमुख :- प्रभाग क्र.२९ (१३ जुना) मध्ये नवसहयाद्री व परिसरात पावसाळी लाईन टाकण्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे. कर्वेनगर मधील ताथवडे उद्यान समोरील मधुसंचय सोसायटी रस्त्यावर पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जुनी वाहिनी काढून नव्याने मोठ्या आकाराची वाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले आहे. खोदकाम करताना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडची (MNGL) वाहिनी तुटली गेल्याने परिसरातील गॅस पुरवठा खंडित झाला होता. काल (शुक्रवारी) दोन तासाच्या अथक प्रयत्नाने वाहिनी जोडून गॅस पुरवठा सुरळीत करण्यात आला.
आज शनिवारी पुन्हा दुपारी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडची वाहिनी, पाणी पुरवठा वाहिनी त्याचबरोबर बी. एस. एन. एल ची वाहिनी तुटल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. आखातात भडकलेल्या युद्धामुळे घरगुती वापराच्या सिलिंडरवरही अनेक निर्बंध लादले आहेत. सध्या MNGL ची वाहिनी घरात असल्याने आमच्याकडे सिलेंडरचा प्रश्न येत नाही परंतू वाहिनी तुटल्याने स्वयंपाक कसा करावा असा सवाल स्थानिक गृहिणी यांनी बोलून दाखविला. घरात ज्येष्ठ नागरिक असून काही आजारी आहेत त्यांना खाण्यासाठी काय बनवून द्यावे हा प्रश्न सतावत असल्याचे बोलून दाखविले.
पालिकेच्या मलनिःसारण, देखभाल व दुरुस्ती विभागाचे कनिष्ठ अभियंता अमर साठे यांना विचारले असता ते म्हणाले की, काम सुरू करण्यापूर्वी आम्ही बी. एस. एन. एल, एम. एन. जी. एल, महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाला कळवत असतो तसे कळविले आहे. त्यानंतर काम सुरू केले असून काम करताना नादुरुस्त झाले असून ते दुरुस्त करून घेण्यात येईल.
सामाजिक कार्यकर्ते चारुदत्त घाटगे म्हणाले की, सदर ठिकाणी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे कर्मचारी उपस्थित होते, इतर विभागाचे कर्मचारी तेथे उपस्थित नव्हते. तसेच काम करणारा संबंधित ठेकेदार देखील तेथे उपस्थित नव्हता. ज्यांच्या वाहिनी तेथे आहेत त्या विभागाचे तेथे अधिकारी उपस्थित असणे आवश्यक असून ज्यांनी हे काम घेतले तो ठेकेदार तेथे उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या विभागाचे काम आहे त्या विभागाचे अधिकारी तेथे असणे आवश्यक आहे. पाणी व गॅस वाहिनी तुटल्याने पाणी व गॅस मोठ्या प्रमाणात वाया गेल्याने नागरिकाने हाल झाले आहेत, अशा बेजबाबदार ठेकेदारावर पाणी पुरवठा विभाग व महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड विभागाने कडक कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.
सामान्य जनतेच्या कररुपी पैशातून विकास कामे करण्यात येत असतात. कोणतेही काम ठेकेदार करत असला तरी त्याला मिळणारे बिलाचे पैसे ही जनतेच्या करातूनच दिले जातात. सामान्य जनतेसाठी असलेल्या वाहिनी जर खाजगी ठेकेदार तोडत असेल तर त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.
