
सर्जेराव देशमुख :- दोन उपनगरे जोडणारा कर्वेनगर येथील राजाराम पूल सध्या समस्येने वेढलेला पहायला मिळत आहे. लाखो रुपये खर्च करून राजाराम पूलालगतच वॉकिंग प्लाझा उभारण्यात आला आहे, याठिकाणी असलेल्या समस्येमुळे नागरिकांना वॉकिंग प्लाझावर जाणे त्रासदायक ठरत आहे.
सिंहगडरोड आणि कर्वेनगर भागाला जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे राजाराम पूल. या पुलामुळे नागरिकांना सिंहगड, स्वारगेट, कर्वेनगर, कोथरूड भागाकडे जाणे सोईस्कर ठरत असते. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पुलावर दुभाजक व पदपथाची देखील व्यवस्था विकसित केलेली आहे. तसेच नागरिकांना चालण्यासाठी पालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून वॉकिंग प्लाझा विकसित केलेला आहे.
वॉकिंग प्लाझाचा नागरिकांना चालण्यासाठी फायदा होत असतो. तसेच सेल्फी घेण्यासाठी अनेक युवकांची येथे गर्दी होत असते. सध्या वॉकिंग प्लाझावर मोठ्या कचऱ्याच्या बॅगा पडलेल्या असून संपूर्ण प्लाझा कचऱ्याच्या बॅगने वेढलेला आहे. अनेक दिवस ह्या कचरा बॅग जागेवर ठिय्या मांडून बसलेल्या असल्याने येथे दुर्गंधी पसरली आहे. यामुळे या वॉकिंग प्लाझाकडे पाठ फिरवली असल्याचे नागरिकांनी सांगितले.
मनसेचे सचिन विप्र म्हणाले की, नागरिकांच्या कर रुपी पैशातून महानगरपालिका प्रकल्प विकसित करत असते. या प्रकल्पावर अशा प्रकारची समस्या निर्माण होणे आणि त्याचे निरसन न होणे ही खेदजनक बाब आहे. पालिका प्रशासनाने यावर त्वरीत उपाययोजना करावी अन्यथा या कचऱ्याच्या बॅगा वारजे क्षेत्रीय कार्यालयाला भेट देण्यात येईल व तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील विप्र यांनी दिला आहे.
याबाबत वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ आढाव यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.