
शहरातील अनेक विकासाचे प्रकल्प रखडले असताना आरक्षित भूखंडांचा विकास केला जात नसल्याने ते गिळंकृत केले जात आहेत. कोथरूडमधील अमेनिटी स्पेस/जागा गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाने विकसित केला नसल्याने त्यावर अतिक्रमण झाले आहे. पालिकेची जागा असल्याचा फलक आहे पण अतिक्रमण असल्याने जागा नेमकी कुठे आहे हे समजणे अवघड आहे.
महापालिका क्षेत्रात विविध विकासकामांसाठी भूखंड आरक्षित करण्यात आले होते. काही भूखंड ताब्यात घेतले असून मात्र हे विकसित केले जात नसल्याने या भूखंडावर अतिक्रमण होत असल्याचे दिसते. कोथरूड परिसरातील उजवी भुसारी कॉलनी येथील इशना सोसायटीमध्ये सर्व्हे नं. ७७/२ येथे १०७१.७७ चौ.मी जागा असून अमेनिटी स्पेस / जागा आहे. सदर जागा

पालिकेच्या ताब्यात असून तसा पालिकेने फलक देखील लावला आहे.
पालिकेचा फलक लावला असला तरी पालिकेच्या जागेला सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यात आलेली नाही. तसेच उभारण्यात आलेल्या फलकासमोर वाहने पार्किंग होत असल्याने पालिकेच्या ताब्यात असलेली जागा नेमकी कुठे आहे याचा अंदाज येत नाही.


जागेचे भाव वाढत असून गगनाला भिडले आहेत. आरक्षित व मोठी जागा असून लोकाभिमुख प्रकल्प चांगलाच विकसित होऊ शकतो. सध्या पालिकेच्या जागेच्या पाठीमागील बाजूस पत्रे उभारण्यात आलेले आहेत हे पत्रे एका व्यावसायिकाने उभारले आहेत अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर नागरिकांनी दिली.
ही जागा पडीक तसेच सुरक्षित नसल्याने जागेवर वाहने पार्किंग होत आहेत. अशा प्रकारे पार्किंगच्या नावे हळूहळू अनधिकृत बांधकामे होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही संपूर्ण जागा जर अतिक्रमण झाले तर पुन्हा पालिकेला ताब्यात घेता येणार नाही आणि हा मोक्याच्या जागेवरील भूखंडही पालिकेच्या हातून निसटण्याची शक्यता आहे अशी चिंता नागरिकांना वाटत होती.
याबाबत मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपअभियंता राजेश थोरात यांना विचारले असता ते म्हणाले की, सदर जागा महानगरपालिकेच्या ताब्यात असून जागेवर जाऊन पाहणी करण्यात आली आहे. पत्रे लावण्यात आलेल्या संबंधितांना नोटीस पाठवण्यात येईल. तसेच चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.