
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहाटे ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार वांद्रे येथील सैफच्या राहत्या घरी घडला. या घटनेत सैफ अली खानला सहा जखमा झाल्या असून त्याच्यावर वांद्र्याच्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
हल्ल्याची सविस्तर माहिती
सैफ अली खान घरी असताना एका अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. या व्यक्तीने प्रथम सैफच्या गृहसेविकेसोबत वाद घातला. वादाच्या वेळी सैफ अली खान मधे पडला असता त्या अज्ञात इसमाने त्याच्यावर वार केले. या हल्ल्यात सैफ जखमी झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी वांद्रे भागात सतत नामांकित व्यक्तींना टार्गेट केलं जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “सलमान खानला बुलेटप्रूफ घरात राहावं लागतं आहे, बाबा सिद्दिकींची हत्या झाली, आणि आता सैफ अली खानवर हल्ला झाला. हा ९० च्या दशकातील दहशतीचा ट्रेंड पुन्हा परतत असल्याचा प्रयत्न दिसतो,” असे प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले.
वांद्रे भागातील तिन्ही मोठ्या घटना
वांद्रे परिसरात गेल्या काही काळात घडलेल्या तीन प्रमुख घटनांमध्ये एक पॅटर्न दिसतो. सलमान खानला मिळालेल्या धमक्या, बाबा सिद्दिकींचा खून, आणि आता सैफ अली खानवरील हल्ला या सर्व घटनांमुळे वांद्रे हा टार्गेट झाला आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो.
राजकीय प्रतिक्रिया
या घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. झिशान सिद्दीकी यांनी बिल्डर लॉबीबाबत काही विचारलं जात नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. “लॉरेन्स बिश्नोई गँगला ब्लेम केलं जात आहे, परंतु या घटना मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट आहे,” असे त्यांनी म्हटले.