सामाजिक व ज्ञाती संस्थांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर; समरसता आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प

सर्जेराव देशमुख : दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून कोथरूड परिसरातील विविध सामाजिक व ज्ञाती संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्त्यांचा दिवाळी फराळ स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. रमेश चव्हाण मित्रपरिवाराच्या वतीने कर्वेनगर येथील शैलेश सभागृहात आयोजित या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ह.भ.प. वांजळे महाराज, सुहास परळीकर यांच्यासह विविध मंडळांचे अध्यक्ष, सामाजिक व ज्ञाती संस्थांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते, पत्रकार आणि सोसायट्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळी हा आनंद, प्रेम, बंधुभाव आणि नातेसंबंध दृढ करण्याचा सण आहे. याच भावनेतून कोथरूडमधील राजकीय पक्ष, जात-पात आणि सामाजिक भेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत सामाजिक एकोपा जपावा, समानतेची भावना रुजवावी आणि व्यापक सामाजिक हितासाठी एकत्रितपणे काम करावे तसेच समाजातील विविध घटकांमध्ये संवाद वाढविणे, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि सामाजिक समरसतेची भावना अधिक दृढ करणे, हा या स्नेहमेळाव्याचा मुख्य उद्देश होता असे आयोजक रमेश चव्हाण यांनी सांगितले.
