
सर्जेराव देशमुख – महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच मागील सहा ते सात वर्षांपासून प्रभागातून नाॅट रिचेबल झालेले अनेक लोकप्रतिनिधी पुन्हा ॲक्टिव्ह मोडमध्ये आले. त्यामुळे उमेदवार प्रभागात फिरताना मतदारांकडून शेठ आपले दर्शन झाले, असा गंमतीने चिमटा घेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे उमेदवारांकडूनही मी तुमच्यातलाच, प्रभागातातून कोठे जातोय असे म्हणत, सांगा तुम्हाला काय पाहिजे असे म्हणत मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, यंदा मतदारराजा शेठला आपलेसे करणार का? असा प्रश्न उपस्थित होतो.
२०१७ च्या निवडणुकीत विजयी उमेदवारांपैकी काही उमेदवार सत्कार-समारंभ आटोपल्यावर सहा महिन्यातच प्रभागातून नाॅट रिचेबल झाले. ते थेट आठ वर्षाने प्रगट झाले पण या काळात नगरसेवकाच्या कार्यालयाबाहेर नागरिक समस्या घेऊन येतात. मात्र, कार्यालयात नगरसेवक नसून, त्यांची माणसे आहेत, त्यामुळे समस्या मांडायच्या कोणाकडे असा प्रश्न पडतो. कार्यकर्त्यांना सांगावे तर एका दिवसात होणाऱ्या कामाला दहा ते पंधरा दिवस जातात, कधी कधी तर महिनाभरानंतरही ते काम होत नाही. त्यामुळे नागरिकही कार्यालयाकडे जाणे टाळतात. २०२२ मध्ये निवडणुकाचे बिगुल वाजणार यामुळे नाॅट रिचेबल असलेले नगरसेवक पुन्हा प्रभागात सक्रीय झाले. कार्यालयात हेलपाटे मारून न भेटणारे नगरसेवक थेट दारात आणि चौकात येऊन उभे राहिले. मात्र, निवडणुका पुढे गेल्याचे समजताच सक्रीय नगरसेवक पुन्हा गायब झाले. त्यामुळे केवळ निवडणुकांच्या तोंडावर प्रभागात येऊन मतदारांना विविध अमिषे दाखवून मत घ्यायची आणि नंतर विजयी झाल्यावर प्रभागातील मतदारांना वाऱ्यावर सोडायचे, हे किती वर्षे चालणार ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
११ वर्ष पक्षाचे काम करतोय, प्रभाग ११ मध्येच तिकीट नाही. अजून ११ वर्ष थांबावे लागणार की काय असा सवाल कार्यकर्त्यांना पडला आहे. शेठ नी काय केले तरच सभागृहात जायला भेटेल अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

