
सर्जेराव देशमुख : आषाढी वारीच्या निमित्ताने पांडवनगर येथील संत रामदास शाळेत गेल्या २७ वर्षांपासून वारकरी बांधवांसाठी अखंड सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे. माजी नगरसेविका पद्मजा गोळे व डॉ. तेजस्विनी अरविंद गोळे यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या उपक्रमात यंदा सुमारे ८०० वारकऱ्यांसाठी निवास, अन्नदान, आरोग्य तपासणी व औषध वाटपाची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
यावर्षी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या प्रदेश प्रभारी डॉ. तेजस्विनी गोळे यांच्या पुढाकाराने वारकरी बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात अनेक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधांचे मोफत वितरण करण्यात आले. वारीदरम्यान आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम वारकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला.
यावेळी डॉ. तेजस्विनी गोळे म्हणाल्या, “वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा आहे. डॉक्टर म्हणून समाजसेवा करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी भाग्याची बाब आहे. मंदिरातील पूजेइतकीच निःस्वार्थ मानवसेवाही ईश्वरभक्तीचे सर्वोच्च रूप आहे. गेली २७ वर्षे आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून ही सेवा अखंडपणे सुरू असून, ती पुढेही अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्याचा आमचा संकल्प आहे.
