सर्जेराव देशमुख : पुणे शहरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणात कर्तव्यात कसूर करून बेकायदेशीर बांधकामास संरक्षण दिल्याचा गंभीर आरोप करत पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागातील उपअभियंता ज्योती वेदपाठक व कार्यकारी अभियंता कन्हैयालाल लखानी यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चारुदत्त घाटगे यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
घाटगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रविवार पेठेतील रस्ता रुंदीकरणाने बाधित होत असलेल्या क्षेत्रामध्ये (घरांक ९९७/९९८) बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. याबाबत माहिती अधिकारांतर्गत पदनिर्देशित अधिकाऱ्याने पार पडलेल्या कर्तव्याची माहिती मागणी केली असता निरंक उत्तर प्राप्त झाल्याने प्रथम अपील दाखल केले होते.
सदर बांधकामावर कारवाई करण्याची जबाबदारी असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही न केल्याने बांधकाम पूर्णत्वास गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, एमआरटीपी कायदा तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध तरतुदींचा उल्लेख करत संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्यात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच माहिती अधिकार कायद्यांतर्गत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यास आवश्यक परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. याबाबत आयुक्तांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
