सर्जेराव देशमुख :- गेल्या दोन आठवड्यापासून शहरात पडलेल्या प्रचंड पावसाने वातावरणात बदल झाल्याने विषाणूजन्य आजाराचा धोका बळावला आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी आणि त्यामुळे येणारी कमजोरी वाढत आहे.यासाठी योग्य औषधोपचार आणि विश्रांती घेण्याचा वैद्यकीय तज्ञांनी सल्ला दिला आहे.
जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती पण जुलै मध्ये पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आणि विषाणूजन्य आजाराचेही प्रमाण वाढले आहे असे निरीक्षण तज्ञांकडून नोंदविण्यात आले आहे.
पावसाळ्यात विशाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण हवामान असते त्यामुळे विषाणूजन्य आजाराची साथ वाढते आणि त्याचे रुग्ण वाढतात.
योग्य उपचार आणि विश्रांती यामुळे आजार आटोक्यात राहतो. गर्भवती महिला, मधमेह आणि ह्रदयरोग आणि मुत्रपिंडाचे रोगी यांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन तज्ञांकडून करण्यात आले आहे.
डॉ. संजय बुटाला म्हणाले, “फ्लू’ मुळे सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, जुलाब आणि प्रचंड थकवा ही लक्षणे दिसतात. यामध्ये पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी होते. डेंग्यू सारखे आजारही दिसू लागले आहेत पण योग्य औषधोपचार आणि पुरेशी विश्रांती यामुळे या आजारांना वेळीच आळा घालता येतो.”
विषाणूजन्य आजाराची लक्षणे:-
सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, थकवा

उपाय काय ❓
-फ्लू ची लक्षणे असणाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये
-सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये
-योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घ्यावी.
-गर्भवती महिला, मधुमेह आणि हृदयरोगाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी
-वेळीच वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार घ्यावेत.
