
सर्जेराव देशमुख :- समाजाच्या आरोग्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन निःस्वार्थपणे सेवा करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जीपीए (जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन)च्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला. गेली ३५ वर्षे वैद्यकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जीपीएच्या या कार्यक्रमाला शहरातील २०० हून अधिक वैद्यकीय व्यावसायिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर आणि सुप्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डॉ. दादासाहेब मैंदाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते यावर्षीचा प्रतिष्ठेचा ‘जीपीए ऑफ द इयर’ पुरस्कार ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. रावसाहेब (आर. डी.) पवार यांना प्रदान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी डॉक्टरांनी केवळ उपचारच नव्हे तर समाजात आरोग्यविषयक जनजागृती, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी जपणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. बदलत्या वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांनी आधुनिक तंत्रज्ञानासोबत मानवी संवेदनाही जपाव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आयोजन जीपीएचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब काकडे, उपाध्यक्ष डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता, सचिव डॉ. राजेश दोशी, सहसचिव डॉ. श्रीकांत बेलगमवार आणि सहसचिव डॉ. बाबासाहेब मुंडे यांनी केले.
