सर्जेराव देशमुख : पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर येथे झालेली रोकड चोरीची घटना फरासखाना पोलिसांनी अवघ्या आठ तासांत उघडकीस आणली आहे. या प्रकरणी एका आरोपीस तत्परतेने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून फरासखाना पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११:३० ते ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ५:२० च्या दरम्यान कसबा पेठ येथील कसबा गणपती मंदिराच्या आवारात अज्ञात इसमाने प्रवेश केला. मंदिराच्या गाभाऱ्याची कडी तोडून आत प्रवेश करत तेथील लाकडी दानपेटी, मुख्य गाभाऱ्यासमोरील दोन लाकडी दानपेट्या आणि मारुती मंदिरासमोरील पत्र्याची दानपेटी लोखंडी रॉडच्या साहाय्याने उचकटण्यात आली. या दानपेट्यांमधील अंदाजे ५०,००० ते ६०,००० रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह-आयुक्त संजय जराडे आणि पोलीस उप-आयुक्त ऋषिकेश रावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे आदेश देण्यात आले. त्यानुसार तपास पथकाने मंदिराच्या परिसरातील व रस्त्यांवरील सी.सी.टी.व्ही. (CCTV) फुटेजची अत्यंत बारकाईने पाहणी केली. घटनेच्या वेळी संशयितरीत्या वावरणाऱ्या हालचालींचे निरीक्षण करून पोलिसांनी संग्राम राजेंद्र जाधव (वय २९ वर्षे, रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने या चोरीची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
ही धडक कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह-आयुक्त संजय जराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उप-आयुक्त ऋषिकेश रावळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप देशमाने, पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे व राजेश महाला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे, प्रणिल चौगुले, अंमलदार प्रविण पासलकर, महेश राठोड, सुमित खुट्टे, प्रशांत पालांडे, श्रीकांत वाघवले, विशाल शिंदे, विशाल औटी, नितीन तेलंगे, गजानन सोनुने, नितीन जाधव व चेतन होळकर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
