सर्जेराव देशमुख : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवावे, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) स्थगित करावे आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजात अधिक स्वायत्तता व पारदर्शकता आणावी, या मागण्यांसाठी कॉकरोच जनता पक्षाकडून (सीजेपी) देशव्यापी आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून या आंदोलनाला प्रारंभ होणार आहे.
सीजेपीच्या माहितीनुसार, मुंबईतील पहिले निदर्शन दुपारी ४ वाजता शिवाजी महाराज पार्कच्या गेट क्रमांक ६ येथे आयोजित करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात देशभरात विविध ठिकाणी निदर्शने आणि जनसहभागातून मोहीम राबविण्यात येणार असून, तिचा समारोप नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाने करण्यात येणार आहे.
सीजेपीचे राष्ट्रीय संयोजक व संस्थापक अभिजीत दिपके यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले. सरकार कोणाचे असावे हे जनता ठरवते; मात्र मतदार कोण असतील हे सरकार ठरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक संस्थांचा राजकीय फायद्यासाठी वापर होत असल्याचाही सीजेपीचा आरोप आहे.
सीजेपीने तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा व त्यांच्याविरोधात चौकशी आणि फौजदारी कारवाईची मागणी, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन स्थगित करून २०२५ सालची मतदार यादी वापरण्याची मागणी, तसेच निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया अधिक स्वतंत्र व पारदर्शक करून त्यात नागरी समाजाचा सहभाग सुनिश्चित करण्याची मागणी आहे.
ही मोहीम कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठिंब्याशिवाय स्वतंत्रपणे राबविण्यात येणार असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला अजिंक्य शिंदे, आफरीन नवाज आणि मेहर उपस्थित होते.
