सर्जेराव देशमुख : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणपती विसर्जनाला प्रोत्साहन देण्यासाठी गुणवंत कामगार कल्याण मंडळ, पुणे शहराच्या स्वयंसेवकांनी कर्वेनगर येथील गणपती विसर्जन घाटावर विशेष निर्माल्य संकलन मोहीम राबविली. पुणे महानगरपालिका, स्वच्छ संस्था आणि जनवाणी संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सुमारे दीड टन निर्माल्य संकलित करण्यात आले.
गणेशमूर्तींचे विसर्जन करताना निर्माल्य नदी, ओढे अथवा जलस्रोतांमध्ये न टाकता स्वतंत्रपणे जमा करण्याचे आवाहन स्वयंसेवकांनी नागरिकांना केले. फुले, हार तसेच अन्य निर्माल्यामुळे जलप्रदूषण होऊ नये आणि शहराचे पर्यावरण स्वच्छ राहावे, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
विसर्जनासाठी घाटावर आलेल्या नागरिकांनी स्वयंसेवकांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत निर्माल्य स्वतंत्रपणे जमा केले. पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.
या मोहिमेत गुणवंत कामगार कल्याण मंडळ, पुणे शहराचे अध्यक्ष संपत खैरे, सचिव संजय गोळे, ज्येष्ठ गुणवंत कामगार भाई ताम्हाणे, कामगार भूषण राजेंद्र वाघ, गुणवंत कामगार दिगंबर पोकळे, रविंद्र रायकर, महादेव पाटील, मुकुंद खटावकर, सदाशिव एकसंम्बे, नामदेव भुरुक, नामदेव उईके, राकेश सावंत, सय्यद मॅडम, रमेश डुंबरे आणि चंद्रशेखर अराणके यांनी सहभाग घेतला.
स्वयंसेवकांनी दिवसभर परिश्रम घेत निर्माल्य संकलनासोबतच नागरिकांना स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले. गणेशोत्सवातील धार्मिक श्रद्धेसोबतच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही नागरिकांनी स्वीकारावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

