स्व.विनायकआबा निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम

सर्जेराव देशमुख : पोलीस प्रशासनाचे कामकाज अधिक गतिमान, अद्ययावत आणि तंत्रज्ञानस्नेही व्हावे, या उद्देशाने स्व. कार्यसम्राट आमदार विनायकआबा निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशन व शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या वतीने खडकी पोलीस ठाण्यास संगणकीय साहित्य देण्यात आले.
आकाश अग्रवाल, अम्मार इनामदार, राहुल तावरे, योगेश जाधव यांच्यासह फाउंडेशन व प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, “स्व. विनायकआबा निम्हण यांनी समाजाच्या गरजा ओळखून विविध क्षेत्रांना मदतीचा हात दिला. त्यांची सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. पोलीस प्रशासनाला आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देणे ही समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे.”
पोलीस प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजात या साहित्याचा प्रभावी वापर होऊन नागरिकांना अधिक तत्पर सेवा मिळावी, हा उद्देश असल्याचे माजी शिक्षण मंडळ सदस्य अमित मुरकुटे यांनी यावेळी सांगितले.
लॅपटॉप, संगणक, टॅबलेट, प्रिंटर असे साहित्य खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
