
सर्जेराव देशमुख : कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २९ मध्ये नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी ओपन जीम उभारण्यात आल्या आहेत. मात्र तेथे वाहन पार्किंग केले जात असल्याने ही ओपन जीम आहे की वाहनांचे पार्किंग करण्याची जागा हे स्पष्ट करा असा संतापजनक सवाल व्यायाम प्रेमींनी केला आहे.
कोथरूड विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी लाखो रुपयांचा निधी खर्च करून रिलायन्स मॉल जवळ ओपन जीम उभारले आहे. येथे आधीच रस्ता अरुंद आहे. ही जागा सोसायटीच्या मालकीची असल्याचा फलक तेथे लावलेला आहे. तेथेच रस्त्यावर जीमची खेळणी लावली आहेत. या जीमच्या खर्चाबाबत एका युट्यूबर इन्फ्ल्यूएन्सरने बनवलेला रील चर्चेत आला होता.
दादांनी उभारलेल्या ओपन जिमचा वापर नागरिकांना नियमितपणे व्यायामासाठी वापर करता यावा अशी येथे परिस्थिती नाही. त्यामुळे दादांच्या हेतूलाच काहींनी हारताळ फासला आहे. दादांना अशा प्रकारे आव्हान देण्याची हिम्मत कोण करते आहे, यामागे काय राजकारण आहे अशी चर्चा स्थानिकात सुरु आहे.

जिम परिसरात वाहनांचे पार्किंग होत असल्याने व्यायामासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वाहनांमुळे उपकरणांचा वापर करताना अडथळे निर्माण होत असून, अपघाताचीही शक्यता वाढली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, ओपन जिम परिसरात वाहनचालक सर्रास वाहने उभी करत आहेत यामुळे ही ओपन जिम अडचण नसून खोळंबा ठरत आहे. संबंधित विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक निधीतून उभारलेल्या आरोग्य सुविधेचे पार्किंगमध्ये रूपांतर झाल्यावर नागरिकांच्या कररूपाने उभारलेली जिम कायम पार्किंग समस्येत अडकण्याची शक्यता आहे. याबाबत वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त व पदपथ विभागाचे कार्यकारी अभियंता यांना संपर्क केला असता होऊ शकला नाही.

ओपन जिमच्या लगतच असलेल्या सोसायटीच्या सुरक्षाजाळीवर “तारेच्या कंपाऊंड समोरील चार फुटाचा रस्ता सोसायटीच्या मालकीचा आहे. तरी त्यावर अतिक्रमण करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल” अशा आशयाचा फलक लावण्यात आलेला आहे. त्यामुळे ही ओपन जिम नक्की खाजगी जागेत आहे की सरकारी जागेवर आहे. याबाबत उलटसुलट चर्चा परिसरात रंगली आहे.
