सर्जेराव देशमुख : अनधिकृतपणे वृक्षतोडीचे काम सुरू असताना झाडाचा मोठा भाग अंगावर पडल्याने २९ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) रोजी सेनापती बापट रोडवरील चैतन्य सोसायटी येथे घडली. विठ्ठल अशोक कोळेकर (वय २९) असे मृत युवकाचे नाव आहे. तो सध्या कोंढवा परिसरात राहत होता, तर मूळचा परभणी येथील रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्य सोसायटी परिसरात वृक्षतोडीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. झाड तोडण्याचे काम सुरू असताना अचानक झाडाचा मोठा भाग विठ्ठल कोळेकर यांच्या अंगावर कोसळला. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वृक्षतोडीसाठी महापालिकेची आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का? सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अनधिकृत वृक्षतोड सुरू असताना संबंधित प्रशासनाचे लक्ष कुठे होते, असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून वृक्षतोडीस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते जयदीप पडवळ म्हणाले की, घडलेली घटना ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. महापालिका क्षेत्रात अशा घटना घडत असतात याची माहिती प्रशासनाला नसते ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. अनधिकृत वृक्षतोडीबाबत कडक कारवाई होणे अपेक्षित आहे जेणेकरून भविष्यात अशा गोष्टींना आळा बसेल, वृक्ष व मनुष्याचा जीव सुरक्षित राहील. सदर घटनेबाबत सखोल चौकशी होऊन संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. याबाबत कायदेशीर कडक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील पडवळ यांनी दिला आहे.

याबाबत घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, संबंधिताना तत्काळ कायदेशीर नोटीस बजावण्यात येईल व त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात येईल.
दरम्यान, विठ्ठल कोळेकर यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.
