
सर्जेराव देशमुख : मुळशी तालुक्याची ओळख, प्रतिष्ठा आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मुळशीकरांनी एकजुटीने पुढे येण्याचा निर्धार केला आहे. पुणे शहरासह विविध भागांत वास्तव्यास असलेल्या मुळशीकरांनी एकत्र येऊन तालुक्याच्या नावाचा चुकीच्या संदर्भात होणारा वापर थांबविण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्रात विविध ठिकाणी घडणाऱ्या घटनांची अनावश्यकपणे मुळशीशी तुलना केली जाते. त्यामुळे मुळशी तालुक्याची चुकीची प्रतिमा निर्माण होत आहे तसेच मुळशी तालुक्याबरोबर पुणे जिल्ह्याची देखील बदनामी न कळत होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. यापुढे कोणत्याही चुकीच्या अथवा नकारात्मक संदर्भासाठी मुळशीचे नाव वापरले जाऊ नये, यासाठी जाहीर ठराव करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मुळशीला वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा लाभली असून, शेतकरी, महाराष्ट्र केसरी पैलवान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, डॉक्टर, वकील, अभियंते आणि विविध क्षेत्रांतील गुणवंत व्यक्ती या तालुक्याने घडविल्या आहेत. उद्योजक, व्यावसायिक आणि माजी सैनिकांचीही मुळशीला परंपरा आहे. लाल माती, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, गडकिल्ले आणि ऐतिहासिक वारसा यामुळे मुळशीची स्वतंत्र ओळख आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सरदार व सेनापतींच्या परंपरेशी मुळशीचा संबंध असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. सेनापती बापट यांच्या सत्याग्रहाची परंपरा तसेच मामासाहेब मोहोळ यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानामुळे मुळशीच्या इतिहासाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
या उपक्रमाला पुणे शहरातील विविध गणपती मंडळे, देवी मंडळे आणि सेवा सोसायट्यांनी लेखी पाठिंबा दर्शविला. उपस्थित नागरिकांनीही जाहीर संमती देत या चळवळीला समर्थन दिले.
यावेळी मुळशीतील राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, वारकरी, टाळकरी, उद्योजक तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मुळशीची सकारात्मक ओळख पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि तालुक्याच्या नावाचा गैरवापर रोखण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
