पूल पालिकेचा की खाजगी हा प्रश्न मात्र अनुत्तरित.

सर्जेराव देशमुख : बावधन येथील नाल्यावर लोखंडी पूल उभारण्यात आला असून, हे काम पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काल (दि .२० ऑगस्ट) करण्यात आले. मात्र, हा पूल महापालिकेच्या मालकीचा आहे की खासगी व्यक्तीने उभारला आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण झाले आहे.
बावधन येथील सर्व्हे नंबर ३६ व ३७ च्यामधून नैसर्गिक नाला वाहत आहे. हा नाला अनेक दशकापासून वाहत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. नाल्याच्या दोन्ही बाजूला दोन वेगळे सर्व्हे क्रमांकाच्या जागा असून जागा मालक देखील वेगळे आहेत. सदर ठिकाणी दोन्ही सर्व्हे नंबरमध्ये इमारत विकसित करण्याचे काम सुरू असून सर्व्हे नंबर ३७ मध्ये सुरू असलेले इमारतीचे काम अंतिम टप्यात पोहचलेले असल्याचे पाहायला मिळते.
सर्व्हे नंबर ३७ मधील कामगार, अधिकारी यांना ये जा करण्यासाठी तसेच बांधकाम साहित्य ने आण करण्यासाठी सर्व्हे नंबर ३६ मध्ये असलेल्या नाला पार करत प्रस्तावित डीपी रस्त्यावरून जावे लागत असते. नाला बंदिस्त नाही तसेच नाल्यावर पूल देखील नसल्यामुळे मुख्य रस्त्यावर जाणे अडचणीचे ठरत होते.
काल (२० ऑगस्ट) दुपारी पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर, बांधकाम विकास विभाग झोन ३ चे उपअभियंता भास्कर हांडे, बांधकाम निरीक्षक अजय फाले, पालिकेचे कर्मचारी व सुरक्षा रक्षकांचा मोठा लवाजम्यासह जागेवर दाखल होत प्रस्तावित डीपी रस्त्यावरील पत्र्याचे शेड काढण्यास सुरुवात केली. पत्रा शेड कारवाई पूर्ण करत पुढे सर्व्हे नंबर ३७ मधील इमारतीच्या समोरील नाल्यावर लोखंडी पूल टाकण्यास सुरुवात केली. यावेळी नागरिकांनी त्यांना पूल उभारण्याची परवानगी आहे का ? अशी विचारणा केली असता, तुम्ही जास्त बोलू नका सरकारी काम आहे असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. तसेच कामाला अडवणूक करू नका अन्यथा तुमच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिल्याचे नागरिकांनी सांगितले.
हा पूल महापालिकेने उभा केला की खाजगी व्यक्तीने केला हे समजणे कठीण आहे परंतू महापालिकेच्या परवानगीने व देखरेखीखाली उभारण्यात आला आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या जागेवर अथवा नैसर्गिक नाल्यावर कोणतेही बांधकाम करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, लोखंडी पुलाच्या उभारणीसाठी महापालिकेच्या निधीचा वापर झाला आहे का, तसेच पुलाची देखभाल व भविष्यातील जबाबदारी कोणाची राहणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
याबाबत पालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
