बावधनमध्ये शासकीय मालमत्तेच्या नुकसानीचा आरोप; तक्रार करूनही कारवाईअभावी प्रश्नचिन्ह

सर्जेराव देशमुख : बावधन परिसरात नैसर्गिक नाल्यावर सिमेंट-काँक्रीटच्या पुलाचे बांधकाम सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या बांधकामासाठी पुणे महानगरपालिकेकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असल्याचा दावा तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते राम बोरकर यांनी केला आहे. असे असतानाही अद्याप पोलीस व पालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बावधन येथील सर्व्हे नंबर ३६ व ३७ मधून नैसर्गिक नाला वाहत असून, या नाल्यावर इमारतीमध्ये ये-जा करण्यासाठी पूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून लोखंडी सळ्या टाकण्यात आल्या असून, काँक्रीटचा पाया तयार करण्यात आला आहे. नाल्यातील पाण्याचा प्रवाह सुरू असतानाच बांधकाम करण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
या प्रकाराबाबत नागरिकांनी तक्रारदार राम बोरकर यांना माहिती दिली. बोरकर यांनी पोलिसांशी ११२ क्रमांकावर संपर्क साधत गैर प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पालिकेच्या बांधकाम, ड्रेनेज व पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत परवानगी देण्यात आली आहे का अशी विचारणा केली असता कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.

बोरकर म्हणाले की, नैसर्गिक नाला ही सार्वजनिक व शासकीय मालमत्तेचा भाग असून त्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने बांधकाम केल्यास भविष्यात पावसाळ्यात पाणी साचणे किंवा पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याची भीती आहे. त्यामुळे संबंधित बांधकामाची तातडीने पाहणी करून नाल्यातील बांधकाम थांबवावे. शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याप्रकरणी संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी माझी प्रमुख मागणी आहे.
याबाबत ड्रेनेज विभागाचे अधिकारी सुभाष पावरा यांना विचारले ते म्हणाले की, नाल्यामध्ये कोणतेही काम करण्याची परवानगी आमच्या विभागाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रकार गैर आहे, वरिष्ठांशी बोलून पुढील कार्यवाही करण्यात येईल. बांधकाम विभागाचे उप अभियंता मुकुंद बर्वे यांना विचारले असता ते म्हणाले याबाबत आम्हाला याची कोणतीच कल्पना देण्यात आलेली नव्हती, सदर घटनेची पाहणी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

एकीकडे सामान्य नागरिकांकडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास संबंधित सार्वजनिक प्राधिकरण व पोलिस प्रशासनाकडून तत्परतेने कारवाई केली जाते. मात्र, या घटनेत पालिकेची कोणतीही परवानगी नसतानाही नैसर्गिक नाल्यावर बांधकाम सुरू असल्याचे समोर आल्यानंतर संबंधितांवर पालिका व पोलिस प्रशासन काय कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पालिकेची परवानगी नसल्याचे समोर आल्यानंतरही प्रत्यक्ष कारवाई का झाली नाही? नैसर्गिक नाल्यावर सुरू असलेल्या या बांधकामाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
