सर्जेराव देशमुख : वारजे गावठाण येथील उड्डाणपुलालगत असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे कोंडी होत असलेल्या ठिकाणापासून अगदी लगतच वाहतूक पोलिस स्टेशन असूनही वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

सर्व्हिस रस्त्यावर रिक्षा मोठ्या संख्येने उभ्या राहत असल्याने रस्त्याची उपलब्ध जागा कमी होत आहे. त्यातच पीएमपीएमएल बस, खासगी वाहने आणि दुचाकींची वर्दळ असल्याने वाहनचालकांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत या ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी निर्माण होत आहे.
वाहतूक पोलिस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर असतानाही रिक्षांचे अनियंत्रित पार्किंग आणि वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाययोजना होत नसल्याने ‘वाहतूक पोलिस स्टेशनलगतच वाहतूक कोंडी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी करून रिक्षांचे पार्किंग नियमन करावे, सर्व्हिस रस्ता वाहतुकीसाठी मोकळा ठेवावा आणि कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

