
सर्जेराव देशमुख : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला ‘महापेरेंट्स पालक संघटने’ने जाहीर पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून, सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनाबाबत तार्किक युक्तिवाद करून ‘डॅमेज कंट्रोल’ केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला.
विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर समाधान व्यक्त केले असल्यास, विद्यार्थी अद्याप आंदोलन का करीत आहेत, असा सवाल संघटनेने उपस्थित केला. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रपती निर्णय घेतात, असे सरकारकडून सांगितले जात असल्याने, विवेक भीमनवार यांची नियुक्ती करण्याची शिफारस नेमकी कोणी केली? तसेच त्यांच्याव्यतिरिक्त सक्षम अधिकारी राज्यात उपलब्ध नव्हते का? याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, याबाबत निर्णय घेण्यास सरकारला एवढा वेळ का लागत आहे, असा प्रश्नही संघटनेने उपस्थित केला. ऑनलाइन परीक्षेचा आग्रह केवळ आर्थिक हितासाठी तर नाही ना, अशी शंकाही व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा देणे हे राजकारण नसून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठीची एकजूट आहे, असे संघटनेने स्पष्ट केले. भीमनवार यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी भूमिका दिलीपसिंग विश्वकर्मा, दत्तात्रय पवार, विजयकुमार वाबळे आणि हर्षल भूमकर यांनी व्यक्त केली.
