
सर्जेराव देशमुख : भवानी पेठ परिसरात बेकायदेशीररीत्या देशी दारूची विक्री करणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणावर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी देशी दारूच्या १७९ बाटल्या व रोख रक्कम असा एकूण सात हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.साई नितीन माने (वय १८ वर्षे १ महिना, रा. न्यू नाना पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट-१ चे अधिकारी व कर्मचारी २१ नोव्हेंबर रोजी हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक गस्त घालत होते. यावेळी पोलीस हवालदार बाबा दांगडे व संतोष अनुसे यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, भवानी पेठ येथील कामगार मैदानाजवळील पद्मधारा अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये एक तरुण ‘टँगो पंच’ कंपनीच्या देशी दारूची बेकायदेशीर (ब्लॅकने) विक्री करत आहे.
या माहितीची खातरजमा करून युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने खाजगी वाहनाने संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी संशयित साई माने हा दारूची विक्री करताना रंगेहाथ मिळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून देशी दारूच्या १७९ बाटल्या व विक्रीची रोख रक्कम असा एकूण सात हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला पुढील तपासासाठी समर्थ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, सहायक पोलीस फौजदार भारत भोसले, बाबा दांगडे, संतोष नागरे, संतोष अनुसे, अतुल साळवे, किरण मोरे, सचिन कोळी व महिला पोलीस हवालदार रेश्मा कंक यांच्या पथकाने केली.
