पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेला १ लाखांची मदत देण्याची सामाजिक कार्यकर्ते चारुदत्त घाटगे यांची घोषणा.

सर्जेराव देशमुख : शहरातील इमारतींच्या सामासिक अंतरातील (साइड मार्जिन) आणि पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणे हटवण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने जोरदारपणे हाती घेतली आहे. मात्र, ही कारवाई सुरू असतानाच प्रभाग क्रमांक २९ मधील कै आप्पासाहेब कुलकर्णी पदपथावर असलेली आरोग्य ‘कोठी’ अद्याप तशीच आहे. या अतिक्रमणापासून नागरिकांची मुक्तता केव्हा होणार, असा संतप्त सवाल आता स्थानिक रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, प्रशासनाने हा पदपथ पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेला एक लाख रुपयांची मदत देण्याची जाहीर घोषणा सामाजिक कार्यकर्ते चारुदत्त घाटगे यांनी केली आहे.
पदपथावर कोठीचे साम्राज्य; पादचारी धोक्यात
प्रभाग २९ मधील या मुख्य पदपथावर पक्या स्वरूपाची आणि पत्र्याचे शेड असलेली कोठी उभारण्यात आल्याने पादचाऱ्यांचा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. हा परिसर अत्यंत वर्दळीचा असून येथून दररोज शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी ये-जा असते, तसेच रुग्णालयात व बाजारपेठेत जाणाऱ्यांची गर्दी असते. पदपथावरच ही कोठी असल्याने नागरिकांना नाइलाजास्तव भरधाव वाहनांच्या गर्दीतून मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून लहान-मोठे अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे.
शहरातील इतर भागांतील अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा वेगाने चालत असताना, प्रभाग २९ मधील या कोठीकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते चारुदत्त घाटगे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीकडे लक्ष वेधत थेट एक लाखांचे आव्हान दिले आहे.
“शहरातील सामान्य व्यावसायिकांच्या आणि इतर भागांतील अतिक्रमणांवर जशी तत्परतेने कारवाई होते, तशीच कारवाई प्रभाग २९ मधील पदपथावरील या कोठीवर तातडीने होणे गरजेचे आहे. पालिकेच्या सुविधा भूखंडावर असलेल्या जागेत कोठी उभारावी जेणेकरून पादचाऱ्यांचा हक्काचा रस्ता मोकळा व्हावा, हीच आमची भूमिका आहे. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता हा पदपथ अतिक्रमणमुक्त करून दाखवल्यास, मी स्वतःहून महापालिकेला एक लाख रुपयांची मदत देईन.”
— चारुदत्त घाटगे (सामाजिक कार्यकर्ते)
आता महापालिका प्रशासन आणि अतिक्रमण विभाग या आव्हानाची दखल घेत प्रभाग २९ मधील या पदपथावर नेमकी कधी कारवाई करते आणि नागरिकांना सुरक्षित रस्ता मिळवून देते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

