नगरसेवक स्वप्नील दुधाने यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न; ‘ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेमुळे रस्ता होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा

सर्जेराव देशमुख : राजाराम पुलाजवळील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. प्रभागातील महालक्ष्मी लॉन्स येथील ए. जे. वृंदावन सोसायटीसमोर आणि सायली शेल्टर सोसायटीमागे असलेल्या पाणंद रस्त्याच्या रुंदीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.
सध्या हा रस्ता अरुंद असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. याचा फटका वाहनचालक व स्थानिक नागरिकांना बसत असून त्यांचा वेळ आणि इंधन वाया जात होते. नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी हा रस्ता तब्बल १५ मीटर (अर्थात ५० फूट) रुंद करण्यात येणार आहे.प्रशासकीय पातळीवर ९ वेळा पाहणी दौरेनिवडून आल्यापासून स्थानिकांची ही रास्त मागणी पूर्ण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि शहर सुधारणा समितीचे सदस्य स्वप्नील देवराम दुधाने यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या कामातील तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी तब्बल ९ वेळा संयुक्त पाहणी दौरे (व्हिजिट) आयोजित करण्यात आले. यामध्ये महापौर, मनपा आयुक्त नवलकिशोर राम, पथ विभागाचे मुख्य अभियंता आणि मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. सर्व अडथळ्यांवर मात करत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
जागतिक सायकल स्पर्धेमुळे रस्त्याचा दर्जा उंचावणारयेत्या जानेवारी २०२७ मध्ये पुण्यात होणाऱ्या जागतिक ‘ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या’ (Grand Tour Cycle Race) मार्गात या रस्त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम अत्यंत दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय निकषांनुसार होणार असून, प्रवाशांना अतिशय उत्तम दर्जाचा रस्ता उपलब्ध होणार आहे.

“वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा होता. मनपा आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आज या कामाचे भूमिपूजन पार पडले. काम सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी व्यक्त केलेले समाधान हीच माझ्या कामाची खरी पोहोचपावती आहे.”— स्वप्नील देवराम दुधाने (नगरसेवक व सदस्य, शहर सुधारणा समिती, पुणे मनपा)
