मानाच्या पाचही गणपतींसह दगडूशेठ, भाऊ रंगारी गणपतीचे घेतले दर्शन; बळीराजासाठी गणरायाला साकडे

सर्जेराव देशमुख : गणेशोत्सवाच्या उत्साहात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्री भाऊ रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे, गणपती दर्शनासाठी त्यांनी रिक्षाने प्रवास केला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विविध गणेश मंडळांना भेट देत पाटील यांनी गणरायाचे दर्शन घेतले. मानाच्या पाच गणपतींच्या दर्शनानंतर त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती तसेच श्री भाऊ रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणेशभक्तांशी संवाद साधून त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, गणपती दर्शनासाठी मंत्री पाटील यांनी रिक्षाने प्रवास केल्याने त्यांच्या या साध्या आणि आगळ्या प्रवासाची उपस्थितांमध्ये चर्चा रंगली. गणेशोत्सवातील पुण्याची पारंपरिक आणि ऐतिहासिक संस्कृती, भक्तिभाव व उत्साहाचा अनुभव घेत त्यांनी गणरायाकडे राज्याच्या प्रगतीसह नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
अडचणीत सापडलेल्या बळीराजाला दिलासा मिळावा, त्याच्या समस्या दूर व्हाव्यात आणि राज्यातील शेतकरी सुखी-समृद्ध व्हावा, यासाठीही चंद्रकांत पाटील यांनी गणरायाला साकडे घातले.

