नगरसेवक स्वप्निल दुधाने यांची मागणी; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आठ मुद्द्यांवर भर.

सर्जेराव देशमुख : कर्वेनगर ते सनसिटी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी परिसरातील अर्धवट रस्त्यांची कामे पूर्ण करा, अशी ठाम मागणी नगरसेवक स्वप्निल देवराम दुधाने यांनी केली आहे. उड्डाणपुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून, रस्त्यांची कामे रखडल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
गुरुवारी (दि. ८ ऑक्टोबर) पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागातील अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून दुधाने यांनी कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आठ प्रमुख मागण्या मांडल्या.
शिवणे-खराडी १२० फुटी डीपी रस्ता, जावळकर वस्ती ते डॉ. आंबेडकर चौक ३० मीटर रस्ता आणि कर्वेनगरमधील १२ मीटर डीपी रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. शाहू कॉलनीतील रस्त्यांचे रुंदीकरण, अंतर्गत रस्त्यांवरील चारचाकी वाहतुकीचे नियमन, नदीलगतच्या रस्त्याचे पदपथ, महालक्ष्मी लॉन्स पाणंद रस्त्याचे डांबरीकरण आणि डी मार्ट ते दुधाने नगरदरम्यानचा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यावरही भर देण्यात आला.
“उड्डाणपूल सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण झाली, तरच वाहतूक कोंडी टाळता येईल,” असे दुधाने यांनी स्पष्ट केले. पुढील दोन महिन्यांत ही कामे पूर्ण करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
महापालिका अधिकाऱ्यांनी मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यापूर्वी संबंधित मुद्द्यांचा विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे दुधाने यांनी सांगितले.

