
एक लाख रुपयांचे होते बक्षीस; मुळशीत सापळा रचून केली कारवाई
सर्जेराव देशमुख : खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आलेल्या प्रकरणातील एक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला कोथरूड पोलिसांनी मुळशी तालुक्यातून अटक केली. प्रदीप दत्तात्रय कंधारे (रा. मराठा महासंघ सोसायटी, शास्त्रीनगर, कोथरूड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात कंधारे हा पोलिसांना हवा होता. तो गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. तो मुळशी परिसरात असल्याची गुप्त माहिती पोलिस हवालदार राजेंद्र लांडगे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर धुळे यांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले.
पोलिसांनी मुळशी परिसरात आजूबाजूला पाहणी करून सापळा रचला. त्यानंतर आंदेशे गावातील भैरवनाथ मंदिर परिसरात संशयितरित्या फिरताना कंधारे आढळून आला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पुढील योग्य कारवाईसाठी आरोपीला गुन्हे शाखा-१ यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहायक पोलिस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण घोडके, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनील कारोटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर धुळे यांच्या पथकाने केली.कारवाईमध्ये पोलिस हवालदार राजेंद्र लांडगे, दत्ता सोनावणे, श्रीकांत दराडे, शकील पठाण, पोलीस शिपाई ऋषिकेश कोळप, मयूर पांढरे, गणेश डोंगरे, वैभव शितकल, आकाश वाल्मिक आदींनी सहभाग घेतला.
