
सर्जेराव देशमुख : शहरात पाण्याची टंचाई आणि अपुऱ्या साठ्याचे कारण देत महापालिकेने अनेक भागांत दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत असताना दुसरीकडे पालिकेच्या जलवाहिन्यांवरील व्हॉलमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाल्याचे समोर आले आहे.
वारजे जुना जकात नाका येथे पुणे महानगरपालिकेची पाणी पुरवठा करत असलेल्या वाहिनीच्या व्हॉलमधून लाखो लिटर पाणी वाया गेल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
रस्त्यावर पाणी सोडले तर पालिका संबंधितावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारत असते. आज दुपारी रस्त्यावर वाहत असलेल्या पाण्याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गळती थांबवावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच पाणी बचतीबाबत नागरिकांना उपदेश करण्यापूर्वी स्वतःच्या यंत्रणेतील त्रुटी दूर कराव्यात, अशी देखील मागणी केली आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र समोर येत असून, याकडे महापालिका आयुक्तांनी तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
