सर्जेराव देशमुख : सहकारी संस्थांच्या कामकाजावर देखरेख ठेवणाऱ्या उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर (१) कार्यालयातील अधिकाऱ्यांनी शासकीय कर्तव्य व जबाबदाऱ्यांचे पालन न केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते चारुदत्त घाटगे यांनी केला आहे. याबाबतचे लेखी निवेदन सहकार आयुक्त यांना दिले आहे.
तक्रारीत संबंधित अधिकाऱ्यांनी शासन परिपत्रकानुसार आवश्यक असलेली शपथ न घेतल्याचा, संस्थांशी संबंधित तक्रारी व चौकशी प्रकरणे दिर्घकाळ प्रलंबित ठेवल्याचा तसेच माहिती अधिकार व सहकार कायद्यांतील तरतुदींनूसार अपेक्षित कार्यवाही न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घाटगे यांनी दिलेल्या निवेदनात सन २०१२ ते २०२४ या कालावधीतील संस्थेच्या कामकाजासंबंधी कागदपत्रे उपलब्ध करून देण्याबाबत आदेश असूनही संस्थेने त्या आदेशाची अवज्ञा केल्याप्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचे म्हटले आहे. तसेच संस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहार, लेखापरीक्षणातील त्रुटींबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप करत त्यांच्या दुर्लक्षामुळे संस्थेच्या हितास बाधा पोहोचल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत आवश्यक चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, कार्यालयात लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत या कार्यालयाकडून उपलब्ध होणाऱ्या सेवांची सूची, नियतकाळ मर्यादा, प्रथम अपिल प्रधिकारी द्वितीय अपील प्राधिकारी वगैरे आवश्यक माहितीचा फलक नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी, अशी मागणी सहकार मंत्री, आयुक्त सहकार, सहनिबंधक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
तक्रारीमुळे सहकार विभागातील कामकाजाच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित विभागाकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागले आहे.
