
सर्जेराव देशमुख : कोथरूड परिसरातील एका मोबाईल दुकानाबाहेर पार्क केलेल्या दुचाकीची चोरी करणाऱ्या सराईत वाहनचोराला कोथरूड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून पाच चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, फिर्यादी यांनी ३ जून २०२५ रोजी आपली दुचाकी दुकानाबाहेर उभी केली होती. काही वेळाने परत आल्यानंतर वाहन चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनील कारोटे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान गुजरात कॉलनी परिसरात संशयित फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.चौकशीत आरोपीचे नाव विष्णू राम संगत (वय ४०, रा. जयभवानी नगर, कोथरूड, पुणे) असे निष्पन्न झाले. आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याने वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून कोथरूड पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले असून एकूण पाच चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून तपास सुरू आहे.ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे, पोलिस उपायुक्त परिमंडळ-३ सागर कवडे, सहाय्यक पोलिस आयुक्त कोथरूड विभाग सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत पोलिस निरीक्षक अरुण घोडके, अनिल माने, सुनील कारोटे, पोलिस उपनिरीक्षक मोहन खरात, पोलिस अंमलदार दत्ता सोनवणे, श्रीकांत दांडे, मयूर पांडे, सचिन डोंगरे, जय प्रसाद, नंगरे शेलके, आकाश वाल्मिकी, विष्णू गाडे, वैभव शिवतारे आणि शशिकांत वाघ यांनी सहभाग घेतला.
