
सर्जेराव देशमुख :- पुणे महानगरपालिकेच्या कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत १९ मोकादमांची नेमणूक केली आहे. १ जून २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार प्रत्येक मोकादमाच्या कामाचे स्वरूप निश्चित करण्यात आहे. पण हे करताना एखाद्या मोकादमावर एवढी मेहेरबानी किंवा जबाबदारी का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आनंद निवृती पालखे या मोकादमाला जबाबदारी देताना दुपार पाळी पौड रोड कचरा हस्तांतरण केंद्र संपूर्ण कामकाज पाहणे तसेच सकाळपाळी व रात्र पाळी मधील हॉटेल गाडीवर नियंत्रण ठेवणे तसेच दुपारपाळी मधील खात्याच्या आणि इतर तथा स्वयंभू, अमृत इ. ठेकेदार गाडीवर नियंत्रण ठेवणे अशी भली मोठी जबाबदारी दिली आहे. इतर मोकादमांना मात्र त्यांच्या आरोग्य कोठी पुरती जबाबदारी आहे. एक मोकादम किती वेळ व क्षेत्रासाठी काम करू शकेल याचा विचार करून जबाबदारीचे वाटप व्हायला हवे होते. मात्र पालखे यांना सकाळ, दुपार व रात्र पाळी अशा जबाबदारीचे वाटप केल्याचे दिसत आहे. नियमाप्रमाणे ८ तास काम करणे अपेक्षित आहे. येथे दिलेली जबाबदारी जर तीन पाळ्यांशी संबंधित असेल तर तो कामगार काय दिवसाचे २४ तास काम करणार का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
यातील अमिता संदीप जाधव या मोकादम नेमणूक होवूनही अद्याप हजर नाहीत. तर एकूण १९ पैकी ५ मोकादम हे प्रभारी आहेत. मोकादमांना दिलेल्या जबाबदारी मध्ये प्रामुख्याने त्यांना दिलेल्या आरोग्य कोठीचे संपूर्ण कामकाज पाहणे ही जबाबदारी असते. एका मोकादमाला क्षेत्रीय कार्यालयाचे संपूर्ण कामकाज पाहणे, कचरा हस्तांतर केंद्र पाहणे अशी जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे नक्कीच काहीतरी लाभाचे काम असावे अशी उलटसुलट चर्चा कार्यालयात रंगू लागली आहे.
याबाबत सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांना संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
