
सर्जेराव देशमुख : पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक-२ ने अवैध अग्निशस्त्रांची विक्री करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करून त्याच्याकडून ५ गावठी पिस्टल आणि ७ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख ९६ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथक-२ ला सराईत आरोपी शेख अहमद उर्फ बबलू सुरज सय्यद (रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) हा लातूर येथून पुण्यात येऊन अवैध शस्त्रांची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपी सोशल मीडियावर गावठी पिस्टलसह फोटो प्रसारित करून तसेच इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधून शस्त्रांची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून शस्त्रे खरेदी करणाऱ्या काही व्यक्तींचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.
या कारवाईत आरोपीकडून ५ गावठी पिस्टल व ७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तपासात आरोपीविरुद्ध वडगाव पोलीस ठाणे हद्दीत २ गुन्हे तसेच येवलेवाडी पोलीस ठाणे हद्दीत १ गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-२ चे पोलीस निरीक्षक राम राजमाने व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, कानिफनाथ कारखेले, पवन भोसले, आझाद पाटील, प्रशांत शिंदे, विनोद महाजन, संजय आढारी, अनिल कुसाळकर, प्रदिप परीट, सुजित वाघमारे, गणेश खरात, नितीन मुंढे, चेतन आपटे, किरण पडयाळ, अजिनाथ येडे, दिलीप गोरे, साहील शेख, रविंद्र रोकडे, शेखर खराडे, अमोल घावटे, अमोल राऊत यांनी सदरची कामगिरी केली आहे. अवैध शस्त्रांच्या तस्करीविरोधात पुणे पोलिसांची ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे.
