
सर्जेराव देशमुख : एरंडवणा येथे एका बांधकाम सुरू असलेल्या साईटवरून अचानक फरशी खाली पडल्याने रस्त्याने जात असलेला रिक्षाचालक जखमी झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक युवराज शिंदे हे आपल्या रिक्षातून एरंडवणा येथील पांडुरंग कॉलनीतून वाहतूक करत असताना बांधकाम साईटच्या वरच्या मजल्यावरून फरशीचा तुकडा खाली कोसळला. हा तुकडा जोरात रिक्षावर आदळल्याने रिक्षाच्या क्षताचे नुकसान झाले व क्षताखाली बसलेल्या शिंदे यांच्या खांद्यावर जोरात लागली. यामुळे खांद्याला जबर मार लागला असून ते जखमी झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत बांधकाम विकास विभाग झोन ६ चे उपअभियंता दीपक सोनवणे यांना विचारले असता ते म्हणाले की, प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यात येईल व पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
बांधकाम साईटवर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबत प्रश्न उपस्थित होत असून संबंधित बांधकाम व्यावसायिक व कंत्राटदाराविरुद्ध कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

