
सर्जेराव देशमुख : कोथरूड भागातील शास्त्रीनगर येथील स्मशानभूमीतील अंत्यविधीसाठी उभारण्यात आलेल्या शेडची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, संपूर्ण शेडमधून पावसाचे पाणी गळत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुसळधार पावसात अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना शेडमध्ये उभे राहूनही छत्री घेण्याची वेळ आल्याचे चित्र समोर आले आहे.
शेडच्या पत्र्यांना अनेक ठिकाणी छिद्रे पडल्याने पावसाचे पाणी थेट खाली पडत आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना आसरा मिळत नसून, शोकाकुल वातावरणातही पावसापासून बचाव करण्यासाठी छत्र्यांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी स्मशानभूमीतील शेडची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित व गळतीमुक्त व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. विशेषतः पावसाळ्यात अशा मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होणे अत्यंत गंभीर असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कनोजिया यांनी पुणे महानगरपालिकेने तातडीने पाहणी करून शेडची दुरुस्ती करावी, जेणेकरून अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास थांबेल, अशी मागणी केली आहे.
