
सर्जेराव देशमुख : राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त मॉडर्न विकास मंडळातर्फे कोथरूड येथील वैद्यकीय व्यावसायिकांचा सन्मान करून त्यांच्या आरोग्यसेवेतील योगदानाला मानवंदना देण्यात आली. मॉडर्न विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास सुखदा फाउंडेशनच्या स्मिताताई समीर पाटील, कोथरूडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, नगरसेविका मनिषा संदीप बुटाला आणि ॲड. तनिषा पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टरांनी समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. संदीप बुटाला यांनी वैद्यकीय व्यवसायातील विविध आव्हानांचा उल्लेख करत डॉक्टरांचे समर्पण, सेवाभाव आणि रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तसेच डॉक्टरांचा सन्मान हा त्यांच्या कार्याप्रती व्यक्त केलेला समाजाचा कृतज्ञभाव असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय बुटाला यांनी केले. या प्रसंगी कोथरूड परिसरातील ७० हून अधिक वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते.
